Ahmednagar : जीवनातील पहिली कमाई वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी दीपावली भेट ।

Ahmednagar: Deepavali gift for senior citizens of the first earning old age home


      पंढरपूर  येथील साहित्यिक व सामाजिक उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेणारे दांपत्य श्री. व सौ. सविता रवि  सोनार यांची सुकन्या कुमारी रेवती रवि सोनारने जीवनातील पहिल्याच कमाईतून काही रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणून सर्वांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. कुमारी रेवती सोनारने जीवनातील पहिल्याच कमाईतील काही रकमेतून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी दीपावली सणासाठीचे महत्वाचे जिन्नस भेट स्वरुपात दिले आहेत. यामध्ये आयुर्वेदिक सुगंधी उटणे, सुगंधी तेल, अंगाचे साबण, शाम्पू, मेंदीचे कोन, नेल पॉलिश, टल्कम पावडर यासोबतच आपल्या सर्वांबरोबर वृद्धाश्रमातील दिवाळी पहाट प्रकाशमय व्हावी म्हणून पणत्या असे दिवाळवाण आहे.

           श्री. व सौ. सविता रवि सोनार हे सखा-सखी नेहमीच त्यांच्या परिवारातील व्यक्तींचे जन्मदिवस आणि लग्नाचा वाढदिवस तसेच भारतीय सण-उत्सव यांच्या औचित्याने खारीचा वाटा स्वरुपातील सामाजिक कार्य करत असतात. अधिकाधिक कुटुंबांनी आपापल्या परिवारातील सदस्यांच्या जन्मदिवस तसेच विवाह-वाढदिवसाच्या औचित्याने खारीचा वाटा स्वरुपातील सामाजिक कार्य केल्यास परिसरातील गरजूंना काहीअंशी का होईना मदत होऊ शकेल तसेच आपण सामाजिक कार्यास हातभार लावू शकलो याचे मानसिक समाधान लाभू शकेल असे श्री. व सौ. सविता रवि सोनार या दांपत्यांना वाटते.

          याप्रसंगी बोलताना सुवर्णकन्या कुमारी रेवती सोनार म्हणाली की - “या एकवीसाव्या शतकातील धकाधकीच्या जीवनात प्रत्येकास वेगवेगळ्या सण उत्सवाच्या निमित्ताने आनंद मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”

          गतवर्षी पॉकेट मनीच्या माध्यमातून दिवाळी फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन सोनार भावंडांनी ती रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणली होती. यावर्षी मात्र कुमारी रेवती सोनारनी स्वतःच्या जीवनातील पहिल्याच कमाईतील रक्कम उपयोगात आणून सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला आहे. यामुळे पंढरपूर आणि परिसरातून तसेच महाराष्ट्रातील अनेक भागातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सुवर्णकन्या कुमारी रेवती सोनारचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने