Dada Patil College:सामाजिक जाणिवेतून लेखन करत गेल्यास उत्तम साहित्य निर्मिती होते - प्राचार्य डॉ.महेंद्र कदम
जगणं हे अवतीभोवती बलपेरलेलं असतं, त्या जगण्यातच साहित्य दडलेलं असतं. जगण्यातील सामाजिक जाणिवेच्या कळीच्या जागा शोधून त्या लिहीत गेल्यास
त्यातून उत्तम प्रकारची साहित्य निर्मिती होते. असे प्रतिपादन मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी केले.
येथील दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ' लेखक आपल्या भेटीला 'या उपक्रमांतर्गत 'साहित्य लेखन कसे करावे?'या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके होते. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. संजय नगरकर,' बिरोबाचं चांगभलं 'या कादंबरीचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार मारुतराव वाघमोडे उपस्थित होते.
साहित्य लेखनाची महत्त्वाची सूत्रे सांगताना प्राचार्य डॉ. कदम म्हणाले की, साहित्यातून प्रत्येक वाचकाला मी त्यात कुठे आहे, हे लेखकाला दाखविता आले पाहिजे. जितके स्वतःविषयी आपण प्रामाणिकपणे लिहीत जातो, तेवढे ते साहित्य वैश्विक होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम यांचे अभंग होत. मात्र स्वतः विषयी लिहिताना मानव जातीचे आदर्श व सामाजिक जाणिवा यांची उत्तम प्रकारे जोड देत, योग्य शब्दांची निवड करून स्वतःच्या भाषेत लिहीत गेल्यास त्यातून उत्तम साहित्य निर्मिती करता येते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना फाळके म्हणाले की, आपल्याला प्रथमतः खूप काही चांगलं वाचता आलं पाहिजे. समाज ओळखता आला पाहिजे. माणसांच्या वर्तणुकीचे समीक्षण म्हणजेच साहित्य.त्याला बोलीभाषेची, इतिहासातील सामाजिक, सांस्कृतिक आदर्शांची जोड देता आल्यास , सामाजिक वेदना त्यातून प्रकट करत गेल्यास उत्कृष्ट साहित्य निर्मिती होऊ शकते.
प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी साहित्य निर्मितीच्या बाबतीत मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ,ऐतिहासिक, आर्थिक या संदर्भातील मूलभूत प्रश्न कळले पाहिजेत. माझे अनुभव हे इतरांचे करता आले पाहिजेत.या स्वानुभवातून कागदावर व्यक्त होत गेल्यास उत्कृष्ट साहित्य निर्मिती होऊ शकते.
या कार्यक्रम प्रसंगी मराठी विभागाच्यावतीने नोकरी विषयक मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.भास्कर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भारती काळे यांनी केले ,तर आभार प्रा. वृद्धेश्वर गरुड यांनी मानले.
Post a Comment