Sea Bird Naval Base: आशियातील सर्वात मोठा नौदल तळ , सी बर्ड नाविक तळ, कुठे आहे काय आहे इथे खास ? जाणून घ्या !
Sea Bird Naval Base: सीबर्ड प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा नौदल पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. याअंतर्गत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर कारवार येथे नौदल तळ बांधण्यात येत आहे. अशी माहिती आहे की, आय.एन.एस कदंब हा कर्नाटकातील कारवार जवळ असलेला भारतीय नौदल तळ आहे.
पूर्ण झाल्यावर, तो पश्चिम किनारपट्टीवर आणि सुएझ कालव्याच्या पूर्वेला असलेला भारतीय नौदलाचा सर्वात मोठा नौदल तळ बनेल. भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू युद्धनौका, आय.एन.एस. विक्रमादित्य कारवार येथे आहे.
सीबर्ड प्रकल्पा’अंतर्गत सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 24 जून 2021 ला कर्नाटकातील कारवारच्या नौदल तळाला भेट दिली. भारतीय नौदलाच्या कदंबा हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी नौदल प्रमुख, अॅडमिरल करमबीर सिंग यांच्यासोबत प्रकल्पाचे क्षेत्र आणि कामे सुरु असलेल्या ठिकाणांचे हवाई सर्वेक्षण केले.
संरक्षण मंत्र्यांनी नौदल तळावर सुरु असलेल्या कामांचे परीक्षण केले आणि शिपलिफ्ट मनोऱ्याची क्षमता दर्शविणाऱ्या प्रात्यक्षिकासह तेथे सुरु असलेल्या कामांबद्दल महत्त्वाची माहिती घेतली. त्यांनी नौदलाच्या बंदराला भेट देऊन तिथे सीबर्ड प्रकल्पाच्या दुसऱ्या A टप्प्याअंतर्गत सुरु असलेल्या सागरी कामांचा तसेच पायाभूत सुविधा विकासाचा तसेच तेथील धक्क्याच्या परिचालनाचा आढावा घेतला. येथे विवाहित नाविकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेला देखील राजनाथ सिंग यांनी भेट दिली आणि तेथे उभारण्यात आलेल्या परिणामकारक जल-व्यवस्थापन, घरगुती कचऱ्याची योग्य विल्हेवाट, उर्जेचा परिणामकारक वापर यासारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या आणि पर्यावरण-स्नेही घरांच्या व्यवस्थेची पाहणी केली.
नाविकतळ म्हणजे काय ?
नावीकतळ हे युद्धनौकांसाठी उभारलेले तळ असतात . इथे युद्धनौकांना दारूगोळा, रसद व इंधन इत्यादींचा पुरवठा केला जातो. तसेच नौसैनिकांच्या निवासाचीही सोय यांवर केलेली असते. युद्धनौका व पाणबुड्या यांची बांधणी करणे, त्या दुरुस्त करून त्यांच्यात आवश्यक ते फेरबदल घडवून आणणे इ. कामेही नाविक तळावर चालू असतात . राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने सैनिकी नाविक तळ व गोद्या या नागरी तळांपासून दूर ठेवाव्या लागतात .
जहाजांवर यंत्रे-शस्त्रास्त्रे बसविणे, डागडुजी करणे, तसेच नौसेनेच्या सागरी शिक्षणाची सोय, संशोधन व प्रयोगशाळा, युद्धनौका-पाणबुड्या यांची बांधणी, त्यांची दुरुस्ती व प्रतिसंस्करण, नौकांचा प्रथम सागरप्रवेश करविणे असे कामे असतात .
जगातील काही महत्त्वाचे नाविक तळ(Some of the most important naval bases in the world)
अमेरिका : पर्ल हार्बर, केफ्लाव्हिक, ग्वॉम, मिडवे, द्येगो गार्सीआ, सूबिक उपसागर
रशिया : लेनिनग्राड, सेव्हॅस्टोपोल, व्ह्लॅडिव्हस्टॉक त्याचप्रमाणे बर्बरा, होडेडा, सोकोत्रा व पोर्ट लूई येथे नाविक तळाच्या सोई उपलब्ध असाव्यात असे कळते
ब्रिटन : स्कॅपा फ्लो, पोर्टस्मथ
भारत : मुंबई, कोचीन, विशाखापटनम्
चीन : व्हांपोआ, शांघाय, चुशान इत्यादी
जपान : योकोसूका, कूरे
पाकिस्तान : कराची
इराण : बंदर आब्बास, चाहबहार
इंडोनेशिया : सुरबाया, जाकार्ता