Karjat : युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्या वतीने दादा पाटील महाविद्यालयात ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रम
Ahmednagar : सामाजिक कार्यासाठी आपल्यातील लोकांनी पुढे येवून अन्यायाविरुद्ध लढणे गरजेचे आहे. सत्य हे रोचक, लखलखीत आणि आक्रमक असते. त्यामुळे सत्याच्या बाजूने न्यायाच्या बाजूने असाल तर अन्यायाविरुद्ध रस्त्यावर येऊन न भिता तरुणांनी बोंबा ठोका. तेव्हा क्रांतीला सुरुवात झाली असे म्हणता येईल. माणसा माणसातील अंतर कमी करणे म्हणजे क्रांती. कार्यकर्त्याने जात मानू नये, स्त्रियांचा आदर करावा. आक्रमक अहिंसेने अन्यायाविरुद्ध लढावे आणि सत्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्या वतीने कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात आयोजित ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले, केवळ लोकप्रतिनिधींना लोकांची गरज नसते, तर लोकांनाही चांगल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. हा विचार जेव्हा रुजेल तेव्हा निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या लोकप्रतिनिधींवर लोकांसाठी कार्य करण्याचा एक नैतिक दबाव निर्माण होईल.
प्रास्ताविकात युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे म्हणाले, समाजाला पुढे नेतो तो नेता. सध्या पुढाऱ्यांनी समाज जातीधर्माने गढूळ केला आहे. सध्याचे पुढारी फुकट भोंगे, तलवारी देतील. उंच झेंडे लावतील पण लोकांना मोफत शिक्षण, वीज, स्वस्तात आरोग्य सुविधा देणार नाहीत. सूत्रसंचालन शितल करांडे यांनी केले. युक्रांदचे कर्जत तालुकाध्यक्ष प्रा. किरण जगताप यांनी आभार मानले.
