ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Marathi poetry : प्रेरणादायी मराठी कवितांचा संग्रह

 1. वाचणं हे पेरणं असतं
  तर लिहिणं म्हणजे उगवणं,
  उगवण्याची चिंता करीत
  बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा,
  एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य
  लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
  व्यकंटेश कल्याणकर 

2. भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो…
आणि रिकामा खिसा जगातील ‘माणसं’ दाखवतो.
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
‘विचित्र आहे पण सत्य आहे’
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले तर…!!
जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…!!
चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही…
-पु. ल. देशपांडे 

3. अत्यंत महागडी,
न परवडणारी खऱ्या अर्थाने
ज्याची हानी भरून येत नाही
अशी गोष्ट किती उरली आहे
याचा हिशोब नसताना आपण जी
वारेमाप उधळतो ती म्हणजे
‘आयुष्य’
व. पू. काळे

4. ज्याची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रींमत ह्रदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे,
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे.
दत्ता हलसगीकर

5. ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भितींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
– कुसुमाग्रज

6. मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा,
हातात कसा लागावा
मन थेंबाचे आकाश, लाटांनी सावरलेलं
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्त्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
– सुधीर मोघे

7. असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्तर,
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुनी देताना…
संकटासही ठणकावुनी सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना…
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
विंदा करंदीकर

8.आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो,
उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री, तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल
पु. ल. देशपांडे

9. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा…
माझ्या दुःखी, व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही,
दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा…
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही,
माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा…
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही,
माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा…
माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही,
तरूण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा…
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस करी माझी तक्रार नाही,
ते ओझं वहाण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा…
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच
मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा
तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा…
-रविंद्रनाथ टागोर

10. चार काय करतोस
काहितरी करून दाखव…
वेळ जाईल निघून
प्रवाहामध्ये तरून दाखव…
लाखो आले आणि गेले
बोलून उपदेश सगळे
स्वतः काही नाही केले
फक्त उपदेश दिले…
उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ
सत्याची साथ तू देऊन तर बघ
हिंमत आहे तुझ्यात,
आयुष्याचा शिखर चढण्याची
स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ…
हीच वेळ आहे,
योग्य पाऊल पुढे टाकण्याची
काहीतरी करून दाखवण्याची…
घाबरू नकोस, निर्णय घे
यश तुझ्याच हातात आहे….
-हार्दिक शाह

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !