MLA Rohit Pawar :यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये उभारले जाणार भक्त निवास
आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून नागरिक व वारकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये उभारले जाणार संतछाया भक्त निवास
कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या संतछाया भक्त निवासाचे भूमिपूजन गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व संतपिठाचे मान्यवर, कर्जत-जामखेडमधील आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे वारकरी संप्रदायाचे मान्यवर व पंढरपूरमध्ये असणारे विविध मठाचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्वतः आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये भव्य व सुसज्ज भक्त निवासाची उभारणी करण्यात येणार आहे. त्या संदर्भात अधिक माहिती अशी की कर्जत व जामखेड तालुक्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नागरिक व वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येत असतात. त्यांची राहण्याची गैरसोय होऊ नये या उद्देशाने व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आता या भक्त निवासाची उभारणी पांडुरंगाच्या पंढरपुरात केली जाणार आहे.
संतछाया या भक्तनिवासाच्या भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते.