कर्जत : गंभीर गुन्हेगारीतील टोळीप्रमुख व गुन्हेगार,नगर जिल्ह्यातुन दोन वर्षे हद्दपार
Ahmednagar : कर्जत (Karjat )पोलीस ठाण्याच्या हद्दीसह परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व कायम रहावे व सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करण्यासाठी घातक हत्यारांसह दरोडा, जबरी चोऱ्या,लोखंडी रॉड तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे,किरकोळ कारणावरून नागरिकांना मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या तालुक्यातील एका टोळी प्रमुखासह त्याच्या टोळी सदस्यावर कर्जत पोलिसांनी कारवाई केली आहे. या दोघांनाही नगर जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (Police Inspector Chandrasekhar Yadav)यांनी दिली.
संबंधित इसमांची तालुक्यात एक टोळी सक्रिय असुन ही टोळी धोकादायक, खुनशी, धाडसी व भयंकर आक्रमक, आडदांड, नंगाड वृत्तीची आहे.या टोळीकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत कर्जत पोलिसांनी त्यांच्यावर वारंवार कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.मात्र त्यांच्यात अजिबातच सुधारणा झाली नाही. याचा परिणाम म्हणजे नागरिकांच्या मनात भय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या टोळीविरुद्ध कुणीही उघडपणे तक्रार,साक्ष व माहिती देण्यास पुढे येत नाही.मात्र भविष्यातही गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी कर्जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार कारवाई होऊन हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्फतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी प्रकरणाची सविस्तर चौकशी करून ही टोळी अतिशय घातक,आक्रमक,धोकादायक असल्याचे नमूद करून चौकशी अहवाल प्राधिकरणाकडे सादर केला. त्यानंतर संबंधित गुन्हेगारांनी वकिलामार्फत बचावाचे लेखी म्हणणे सादर केले होते. मात्र हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी टोळीवरील सर्व दाखल गुन्हे,टोळीने केलेल्या बाबींचा व्यापक विचार करून टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ नुसार संबंधितांवर हद्दपारीचा आदेश केला आहे.
त्यामध्ये हद्दपारीचा कालावधी संपेपर्यंत लेखी परवानगीशिवाय त्यांना नगर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.तसेच हद्दपारीच्या कालावधीत जेंव्हा कोणत्याही ठिकाणी ही टोळी व त्यातील सदस्य राहतील त्यांनी तेथील नजीकच्या पोलीस ठाण्यात पत्ता बदल करायचा असो किंवा नसो त्यासंदर्भत महिन्यातुन एकदा कळवणे गरजेचे असल्याचे प्राधिकरणाने आदेश दिले आहेत.
1)पप्पू उर्फ राहुल बाळासाहेब कदम वय 28 वर्ष, राहणार परीटवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर
2)शक्ती उर्फ विशाल अशोक अडसूळ, वय 27 वर्ष, राहणार राशिन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर
आरोपींना काल रोजी जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसठ,पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते, संभाजी वाबळे, भाऊ काळे, संपत शिंदे, ईश्वर माने, मनोज लातूरकर आदींनी, सचिन वारे यांनी केली आहे.
दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई अटळ !
तालुक्यात शांतता-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कर्जत पोलीस कायम प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कोणाकडून कसलाही त्रास होऊ नये यासाठी त्रास देणाऱ्यांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. कायमस्वरूपी त्रास देणाऱ्यांना हद्दपार करण्याची कार्यवाही करण्यात येते त्यामुळे कुणीही गैरकृत्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा कारवाई अटळ आहे.
– चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत