कोकण किनाऱ्यावरील बंदरे (Ports on the Konkan coast)
कोकण किनाऱ्यावरील बंदरे (Ports on the Konkan coast)
मिऱ्या बंदर
रत्नागिरी शहरांत भगवती किल्ल्यावर शहराकडे तोंड करून उभे राहिल्यास एकाच वेळी उजवीकडे काळा समुद्रकिनारा तर डावीकडे पांढरा समुद्रकिनारा बघता येतो. काळ्या रेतीचा भाग म्हणजे मांडवी बंदर व पांढ-या वाळूचे बंदर म्हणजे मिरकरवाडा बंदर.
मांडवी बंदरावर ‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ असून त्या कमानीतून खोलवर गेलेली जेट्टी दिसते व पावले भटकंतीसाठी आपोआपचं तिकडे वळतात.थोडं पुढे गेल्यावर मिऱ्या बंदर लागते जिथून बोटी येत जात असतात व मासळीची चढउतार केली जाते. मिर्या बंदर येथे आता स्कूबा डायव्हिंग सेंटर सुरु झाले आहे.
हर्णे बंदर
हर्णे बंदर हे दापोली जवळ असणार्या समुद्र किनार्यावर आहे . हे रत्नागिरीतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण बंदरांपैकी एक आहे.किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्या शेकडो रंगीबेरंगी बोटी, तऱ्हेतऱ्हेच्या मासळीने भरलेल्या टोपल्या, रंगीत साड्यां नेसून डोक्यावर फुले माळून सर्वत्र वावरणाऱ्या कोळणी, मासळी खरेदी करणारे व्यापारी आणि स्थानिक कोकणी माणसं असं दृश्य आपल्याला सकाळ-संध्याकाळ दररोज हर्णे बंदरावर दिसू शकतं. इथे रोज सायंकाळी चालणारा माशांचा लिलाव बघण्यासारखा असतो.पूर्वीच्या काळी हर्णे हे जलमार्ग वाहतुकीतील एक महत्त्वाचे बंदर होते.
मुसाकाजी बंदर
रत्नागिरी जिल्हयातील प्राचीन बंदरांपैकी एक असलेल्या मुसाकाजी बंदरचा परिसर अप्रतिम आहे. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंत गडाकडून ३ किमीअंतरावर आंबोळगडाच्या डावीकडील रस्त्यावर हे लहानसे बंदर आहे.
इतिहासकाळी कोकण किनारी ८४ बंदराचा थाट होता. कालौघात हि बंदरे नाहीशी झाली किंवा कार्यरत नसली तरी त्या इतिहासाचा अनुभव आजदेखील कोकणात घेता येतो. रात्रीच्या प्रकाशात बंदरापासून दूर उभी राहणारी बोट, लाटांच्या वरखाली लयीबरोबर पडाव -खपाटा -मचव्यातून उतरलेले प्रवासी आणि गावकाडावच्या प्रवासाची आणि बंदराच्या इतिहासाची यादगार अनुभूती घ्यायची असेल तर जुन्या नावाड्यांना भेटायला बंदरावरच गेलेच पाहिजे.