ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Target Olympic Podium Scheme : भारतात पहिल्यांदाच होणार बुद्धिबळ ऑलिंपियाड

Target Olympic Podium Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर आयोजित 44 व्या बुद्धिबळ  ऑलिंपियाडचे उद्घाटन करण्यात आले आहे . फिडे या  संघटनेचे अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली, आणि त्यांनी  ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या हातात ती दिली. ही मशाल येत्या 40 दिवसात 75 शहरात नेली जाणार असून चेन्नईजवळच्या महाबलीपुरम इथे या मशाल रिलेची सांगता होणार आहे . त्याआधी प्रत्येक स्थळी, त्या त्या राज्यातील बुद्धिबळ  अजिंक्यवीर ह्या मशालीचे स्वागत करतील.

“आज भारतातून बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची पहिली मशाल रिले सुरू होत आहे. या वर्षी प्रथमच भारत बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजनही करणार आहे. आपल्या याच जन्मस्थानापासून सुरू झालेला आणि जगभर आपला ठसा उमटवणारा खेळ अनेक देशांसाठी आवडीचा बनला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”असे पंतप्रधान यावेळी म्हणाले

“कित्येक शतकांपूर्वी या खेळाची मशाल भारतातून चतुरंगाच्या रूपाने जगभर गेली. आज बुद्धिबळाची पहिली ऑलिम्पियाड मशालही भारतातून बाहेर पडत आहे. आज जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या  75 वर्षानिमित्त   अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा ही बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल देशातील 75 शहरांमध्येही जाईल.” असेही, मोदी यावेळी म्हणाले.

 

गेल्या काही वर्षांत भारताच्या बुद्धिबळातील कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे त्याने नमूद केले. या वर्षी, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताचा संघ आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आहे. भारत यंदा पदकांचा नवा विक्रम करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

बुद्धिबळ आपल्याला आपल्या जीवनात जे काही धडे देते त्याबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. जीवनात त्यांचे स्थान काहीही असले तरी प्रत्येकासाठी योग्य पाठबळाची  गरज अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, “बुद्धिबळाच्या प्रत्येक प्याद्याप्रमाणेच स्वतःचे वेगळे सामर्थ्य आणि एक अद्वितीय क्षमता असते. जर तुम्ही प्यादे योग्यरित्या हलवले आणि त्याचे सामर्थ्य योग्य प्रकारे वापरले तर ते सर्वात शक्तिशाली बनते. बुद्धिबळाच्या पटाची ही खासियत आपल्याला जीवनाचा मोठा संदेश देते. योग्य आधार आणि योग्य वातावरण मिळाल्यास, सर्वात कमकुवत व्यक्तीसाठीही कोणतेही ध्येय अशक्य नसते.”

बुद्धिबळातील आणखी एक शिकवण  अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, “बुद्धिबळ खेळाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे दूरदृष्टी. बुद्धिबळ आपल्याला सांगते की खरे यश हे अल्पकालीन यशापेक्षा दूरदृष्टीने प्राप्त होते.”   भारताचे  क्रीडा धोरण आणि लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना (TOPS) यासारख्या योजना याच विचारातून काम करत असून  त्याचे  परिणाम दिसायला  सुरुवात झाली असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनाला आणून दिले.

टोकियो ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, थॉमस चषक आणि बॉक्सिंगमध्ये भारताच्या अलीकडच्या यशाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “आपल्या देशात नैपुण्याची  कमतरता नाही. देशातील तरुणांमध्ये धैर्य, समर्पण आणि ताकदीची वानवा नाही. पूर्वी आमच्या या तरुणांना योग्य व्यासपीठाची वाट पाहावी लागत होती. आज, ‘खेलो इंडिया’ मोहिमेअंतर्गत, देश या नैपुण्याचा  शोध घेत आहे आणि त्यांना घडवत आहे. खेलो इंडिया अंतर्गत देशाच्या दुर्गम भागातून क्रीडा प्रतिभा उदयास येत आहे आणि देशातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत क्रीडा विषय हा इतर शैक्षणिक विषयांप्रमाणेच महत्त्व देण्यात आले  आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  फिजिओ, स्पोर्ट्स सायन्स यासारख्या खेळांचे अनेक नवे आयाम समोर येत आहेत आणि देशात अनेक क्रीडा विद्यापीठे सुरू होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी खेळाडूंवरील अपेक्षांचे दडपण मान्य केले आणि त्यांना कोणत्याही तणाव किंवा दबावाशिवाय शंभर टक्के योगदान देण्याचा सल्ला दिला. तुमची मेहनत आणि समर्पण देश पाहतो, असे ते म्हणाले. विजय हा जितका खेळाचा भाग आहे, तितकाच पुन्हा जिंकण्याची तयारी करणे हाही खेळाचा भाग आहे. बुद्धिबळातील एक चुकीची चाल किती महागात पडते ते सांगताना पंतप्रधान म्हणाले की जर एका चुकीने खेळ फिरू शकतो, तर मेंदूच्या सामर्थ्याने परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवता येते, म्हणून शांत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात योग आणि ध्यान यांची मोठी मदत होऊ शकते, असे त्यांनी सुचवले. योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आणि आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावर्षी, प्रथमच, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्था, फिडेने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालची सुरुवात केली आहे जी ऑलिंपिक परंपरेचा भाग आहे, परंतु बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यापूर्वी ही प्रथा नव्हती. बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिले घेणारा भारत हा पहिलाच देश असेल. विशेष म्हणजे, बुद्धिबळाच्या भारतीय मुळांना अधिक उंचीवर नेऊन, बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी मशाल रिलेची ही परंपरा यापुढे नेहमीच भारतात सुरू होईल आणि यजमान देशात पोहोचण्यापूर्वी सर्व खंडांमध्ये प्रवास करेल.

चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमचआणि आशियामध्ये 30 वर्षांनंतर केले जात आहे. 189 देशांचा सहभाग असल्याने कोणत्याही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील हा सर्वात मोठा सहभाग असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !