karjat : पोलीस निरीक्षकांकडून आता कर्जत बसस्थानकातही वाहन पार्किंगसाठी दोरीचा प्रयोग !

कर्जत शहरातील राज्यमार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर बेशिस्त वाहतुकीवर ठोस उपाययोजना म्हणून उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा प्रयोग राबवला आणि इथल्या बेशिस्त वाहतुकीला लगाम बसला. आता कर्जत बसस्थानकाच्या परिसरातही नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवून इथे होणाऱ्या चारचाकी व दुचाकीच्या बेशिस्त पार्किंगला एका सरळ रेषेत उभा करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आणि विशेष म्हणजे या नियमावलीचे जो उल्लंघन करेल त्याला आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
त्यामुळे ‘कर्जतकरांनो,आता दोरीतच रहायचं अन्यथा आर्थिक दंडाला सामोरे जायचं’ जणू असा इशाराच कर्जत पोलिसांनी दिला आहे. कर्जतच्या मुख्य रस्त्यांवर गेली वर्षभरापासून दोरीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वेगळीच शिस्त निर्माण झाली आहे. मात्र बसस्थानकात येणारे नागरीक आपली दुचाकी-चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे कुठेही आणि कशीही पार्किंग करत होते.याचा मोठा त्रास बस चालक व येथील नागरिक, शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. या बेशिस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी एस.टी विभागाकडून पोलीस यंत्रणेला करण्यात आल्या होत्या.
तसेच कर्जत शहरातील पत्रकार यांनीही सदरची गोष्ट पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या लक्षात आणून दिली होती.मात्र नियमावली बनवणे सहजसोपे असले तरी,त्यासाठी अगोदर नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे तेवढेच गरजेचे असते या पार्श्वभूमीवर उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनाखाली गेल्या आठवड्यापासून वाहने पार्किंग व्यवस्थित करण्यासाठी जेसीबी व इतर साहित्याच्या माध्यमातून व्यवस्था करत होते. आता सर्व गाड्यांच्या जागेचे नियोजन करून नायलॉन दोरीचा यशस्वी प्रयोग राबवण्यात आला आहे.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी,गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांना नेमून स्वतः पोलीस निरीक्षक यादव यांनी उभे राहून वाहतूक व्यवस्था दोरीत करून घेतली.कित्त्येक वर्षानंतर कर्जतच्या बस स्थानकात एका दोरीत उभ्या राहत असलेल्या वाहनांनी बस स्थानकाचे सौंदर्य तर वाढवलेच शिवाय बेशिस्त पार्किंवर चांगलीच ठोस उपाययोजना अंमलात आली आहे.या अनोख्या उपक्रमाचे कर्जतच्या नागरिकांतून विशेषतः बस स्थानक विभागाकडून कौतुक होत आहे.यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी,शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.