उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी संशोधनात्मक नवनिर्मित्तीची गरज
उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी संशोधनात्मक नवनिर्मित्तीची गरज - डॉ.तानाजी गुजर
कर्जत : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विषय ज्ञानाच्या बाहेर जाऊन नवीन संशोधनात्मक नवनिर्मित्ती करायला हवी. ज्यामुळे स्वतःचे करिअर तर घडेलच ; परंतु त्याचबरोबर समाजालाही त्याचा उपयोग होईल. मात्र हे करताना आपण ग्रामीण भागातील आहोत,आपल्याला संशोधनात्मक नवनिर्मित्ती जमणार नाही, हा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकावा. उद्याचे उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी संशोधनात्मक नवनिर्मित्तीची गरज आहे. त्या संशोधनाची तयारी वा मार्गदर्शन अशा कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चित मिळते.असे प्रतिपादन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.तानाजी गुजर यांनी केले.
येथील दादा पाटील महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एक दिवशीय कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पत्रकार आशिष बोरा हे होते.
या कार्यशाळेत प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून काहीतरी शक्ती प्राप्त करून बाहेर पडावे. प्रत्येकाच्या ठिकाणी जन्मत:च प्रतिभा नामक शक्ती असते. तिचा विकास होण्यासाठी अशा मार्गदर्शनपर कार्यशाळांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पनांचा त्यातून आविष्कार होऊ शकतो.त्यातून जे संशोधन आकाराला येते तेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा आधार होते आणि समाजात अशा विद्यार्थ्यांचे एक वेगळे अस्तित्व निर्माण होते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मकवृत्ती वाढावी , त्यांच्या आयडिया प्रत्यक्षात साकार व्हाव्यात, या दृष्टीने दादा पाटील महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने विचार करावा.असे आवाहन प्राचार्य डॉ.नगरकर यांनी केले.
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ.संदीप पै यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात ते म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील अस्मिता ओळखून आविष्कार निर्मितीचे कार्य साधण्यासाठी, दादा पाटील महाविद्यालय ग्रामीण भागात काम करत आहे. आज शिक्षणात टक्केवारी बरोबरच संशोधनात्मक नवनिर्मित्तीलाही महत्त्व आहे.ज्या नवनिर्मित्तीचे ज्ञान व आकलन आयडियाचा आविष्कार स्पर्धेतून विद्यार्थ्यांना होईल.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.महेश भदाणे यांनी केले.प्रास्ताविक प्रा.स्वप्नील म्हस्के यांनी केले,तर आभार डॉ.प्रतिमा पवार यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी विज्ञान विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे , प्रा.संतोष क्षीरसागर, प्रा. बलभीम महानवर, डॉ. आशा कदम, डॉ. प्रतिष्ठा नागणे यांच्यासह बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
