Ahmednagar: शेतकऱ्यांच्या विविध गंभीर अडचणी सोडवण्यासाठी आ. रोहित पवारांनी घेतली कृषी मंत्र्यांची भेट
कर्जत जामखेड तालुक्यातील तुर पिकांवर वांझ रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कर्जत तालुक्यात एकूण 11000 हेक्टर तुरीचा उत्पादन घेतलं जात असून जामखेड तालुक्यात एकूण 10000 हेक्टरवर तूरीचे उत्पादन घेतले जाते.
कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघातील विविध अडचणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत. अशातच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध कारणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांची मुंबईत भेट घेतली आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान तुरळक पाऊस झाला असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दांडी मारली आहे.
कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके अवर्षण प्रवण असून येथील शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तूर, उडीद, बाजरी या दोन्ही तालुक्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच कर्जत जामखेड तालुक्यातील तुर पिकांवर वांझ रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कर्जत तालुक्यात एकूण 11000 हेक्टर तुरीचा उत्पादन घेतलं जात असून जामखेड तालुक्यात एकूण 10000 हेक्टरवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. तुरीवर वांज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा रोग आटोक्यात न आल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते या अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावे व पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व पिक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारी खर्चातून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील तात्काळ आमदार रोहित पवार यांच्या विनंतीवरून कृषी आयुक्तांना तूर पिकांवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तात्काळ प्रयत्न करत कृषी सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आ. रोहित दादांच्या यशस्वी प्रयत्नातून आता कर्जत-जामखेड तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळून बळीराजा सुखावला जाणार आहे.
तुरीवर वांझ रोगामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर व देण्यात येणाऱ्या नुकसाभरपाईवर सरकारने लक्ष द्यावं. तसेच नुकसान झाल्यास पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून व पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारी खर्चातून मदत द्यावी, यासोबतच ज्या भागात समाधानकारक पाऊस पडला नाही अशा भागातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देऊन पोखरा योजनेअंतर्गत विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाग सुद्धा घेण्यात यावा याबद्दलची विनंती कृषी मंत्री महोदयांना भेटून केली.
आमदार रोहित पवार(कर्जत जामखेड विधानसभा)