कर्जत:दादा पाटील महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न
रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. सावन पाटील (आरटीओ अहमदनगर ) यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

या स्पर्धेत एकूण ४८ संघ सहभागी झाले होते.त्यामध्ये ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत समाजातील विविध समस्यांवर उपाय सांगणारे संशोधनात्मक प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी सादर केले. उदा. फ्री ईनर्जी जनरेटर, हायड्रोजन फ्युअल प्लॅण्ट ,कांदाचाळ ,मोव्हेबल पेस्टिसाईड स्प्रे , ऑटोमॅटिक वॉटर टँक, इको फ्रेंडली पेन, हर्बल रेमेडी फाॅर रेबीज, लम्पी काऊ डिसीज, डिजिटल मेनू कार्ड फॉर होस्टेल, मॉडिफाईड मोटार , पोर्टेबल सीपीयू वुईथ स्क्रीन, बोरवेलमध्ये अडकलेले मूल बाहेर काढणे असे काही नवनवीन संशोधनात्मक प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी तयार केले होते. ते अनेकांच्या कुतुहलाचे आकर्षण ठरले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आरटीओ श्री.सावन पाटील म्हणाले की, आयोजित केलेल्या आविष्कार संशोधन स्पर्धा व प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नवनवीन विचार व कल्पना जागृत होऊन उत्कृष्ट संशोधन पुढे येईल.आणि त्यातून समाजासाठी चांगले काम उभे राहील.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री.फाळके म्हणाले की, उत्कृष्ट संशोधन प्रोजेक्ट्सना महाविद्यालयाच्यावतीने प्रोत्साहनपर बक्षीसे तर दिली जातीलच ; परंतु स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तर ,विद्यापीठस्तर , ते राज्यस्तरापर्यंत हे प्रोजेक्ट पाठविले जाणार आहेत.एवढेच नाही तर उत्कृष्ट प्रोजेक्टसाठी रयत शिक्षण संस्था व आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहकार्य देण्यात येईल. यातून उत्कृष्ट संशोधक निर्माण व्हावेत,अशी अपेक्षा श्री.फाळके यांनी व्यक्त केली.
प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माणसाला समस्यांमुक्त उत्कृष्ट जीवन जगता यावे,त्यादृष्टीने दैनंदिन गरजांवर उपाय म्हणून संशोधनात्मक दृष्टिकोनातून नवनवीन कल्पना पुढे याव्यात,त्यातून नवोदित संशोधक निर्माण व्हावेत, याहेतूने महाविद्यालयाने या आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, प्रा. भागवत यादव यांच्यासह बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले,तर आभार शैक्षणिक व संशोधन समितीचे समन्वयक डॉ. महेश भदाणे यांनी मानले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयक्यूएसीचे समन्वयक डॉ.संदीप पै , डॉ.अशोक म्हस्के, डॉ. वाल्मिक कापसे, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. प्रतिष्ठा नागणे, डॉ.आशा कदम, डॉ. माधुरी गुळवे, प्रा. बलभीम महानवर, डॉ. गोंदके, प्रा. पाडवी, प्रा. कु.प्रगती खाडे, प्रा.विठ्ठल अस्वले यांनी विशेष परिश्रम घेतले.