Pune News : चंदननगर परिसरात पूर्वेच्या वादातून १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या


 पुणे शहरातून एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. चंदननगर परिसरात पूर्वेच्या वादातून १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास राजमाता जिजाऊ ऑक्सीजन पार्क चंदननगर येथे ही भीषण घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा मुख्य आरोपींना अटक केली असून, पाच विधीसंघर्षित बालकांनाही ताब्यात घेतले आहे. या एकूण ११ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू ऊर्फ लखन बाळू सकट (वय १७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपींसोबत सोनूचा पूर्वी वाद झाला होता. याच जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सोनुला राजमाता जिजाऊ ऑक्सीजन पार्क चंदननगर येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या साथीदारांसह सोनुला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, हल्लेखोरांनी लोखंडी हत्याराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी (वय ३२, रा. चंदननगर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंदननगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये यश रविंद्र गायकवाड (वय १९), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९), जानकीराम परसराम वाघमारे (वय १८), बालाजी आनंद पेदापुरे (वय १९), डरक्या ऊर्फ प्रथमेश शंकर दारकु (वय २०) आणि करण निवृत्ती सरोदे (वय १८, रा. वडगावशेरी, पुणे) यांचा समावेश आहे. यातील करण सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, पाच विधीसंघर्षित बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे चंदननगर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, अल्पवयीन मुलांचा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याने युवा वर्गातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सर्व आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post