अहमदनगर: जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूक निकालांनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar )यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या निकालावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, निवडणुकीत पैशाचा वापर झाल्याचा आणि काँग्रेसने भाजपची 'बी-टीम' म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत रोहित पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
१. निकालावर निराशा आणि पैशांचा प्रभाव: निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पवार म्हणाले की, "जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या ऋणात मी कायम राहीन. मात्र, कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी अपार कष्ट घेऊनही आजचा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे."
ते पुढे म्हणाले की, "सगळीकडे जर पैसाच चालत असेल, तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेत आणण्याचा जो प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार?" सध्याचे राजकारण तत्त्वांवर कमी आणि पैशांनी जास्त गढूळ झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
२. विरोधकांवर सडकून टीका: विरोधकांवर अत्यंत कडव्या शब्दांत टीका करताना रोहित पवार म्हणाले, "आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले, तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते. अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही."
३. काँग्रेसवर गंभीर आरोप: महाविकास आघाडीत असूनही स्थानिक पातळीवर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, "धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची 'B-Team' म्हणून काम केले आणि जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला. लोकही या तिरक्या चालीला बळी पडले."
यामुळे भविष्यात जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. जामखेडच्या या निकालामुळे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.