Satyajit Tambe: वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे चिमुकल्याचा मृत्यू, सत्यजित तांबे यांच्याकडून तीव्र नाराजी.


Satyajit Tambe: संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची वाढती संख्या (bibtya news in sangamner ) आणि त्यामुळे निर्माण झालेली दहशत आता गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. जवळे कडलग येथे बिबट्याने एका सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा जीव घेतल्याने येथील परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर युवा नेते सत्यजीत तांबे यांनी व्यवस्थेच्या उदासीन धोरणांवर तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाला जागे करण्यासाठी वन विभागाच्या कार्यालयावर धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.(sangamner news)


प्राप्त माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना जवळे कडलग गावात घडली असून, बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार या धोक्याची कल्पना देऊनही वनविभाग आणि संबंधित प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी 'माणसांवर होणारे बिबट्यांचे हल्ले ही नित्याची बाब झाली आहे,' असे नमूद करत, 'यामुळे संपूर्ण तालुक्यात दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,' असे म्हटले आहे. (sangamner news marathi)


या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी वनविभागाकडे युद्धपातळीवर काही ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने पिंजऱ्यांची संख्या तातडीने वाढवणे, जेरबंद केलेल्या बिबट्यांना स्थानिक वनक्षेत्राबाहेरील इतर सुरक्षित जंगलात स्थलांतरित करणे आणि बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीसारखी ठोस कार्यवाही करणे यांचा समावेश आहे. या मागण्या त्यांनी अनेकदा अनेक व्यासपीठांवर मांडल्या असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने बिबटे मानवी वस्त्यांमध्ये मोकाट फिरून नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप तांबे यांनी केला.


प्रशासनाच्या या उदासीन धोरणाविरोधात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याच्या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील नागरिक आता रस्त्यावर उतरणार आहेत. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली तमाम संगमनेरकर वन विभागाच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वन विभागाचे कार्यालय, संगमनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करून बिबट्याच्या दहशतीतून नागरिकांना तातडीने मुक्त करण्याचा निर्धार संगमनेरकरांनी केला आहे. वनविभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post