पालघर:पालघर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार पालघर पोलिसांनी गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारा बेकायदेशीर पानमसाला आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत २७ लाख ९३ हजार ७१६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि २० लाख रुपये किमतीचा आयसर टेम्पो असा एकूण ४७ लाख ९३ हजार ७९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बटाट्याच्या गोण्यांमागे लपवला होता गुटखा:
दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एका आयसर टेम्पो (क्रमांक MH 04/LY/5891) मधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व पानमसाला गुजरातकडून मुंबईकडे नेता जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून टेम्पोची तपासणी केली. सुरुवातीला टेम्पोमध्ये बटाट्याच्या गोण्या दिसल्या, मात्र त्यामागे तपासणी केली असता महाराष्ट्रात बंदी असलेला 'केसरयुक्त पानमसाला' आढळून आला.
दोघांना अटक, गुन्हा दाखल:
या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे: १) संजयकुमार रजयंता केवट (वय ४२, रा. भिवंडी, जि. ठाणे)
२) मोहम्मद इस्रार अहमद मोहम्मद शमीम अन्सारी (वय २८, रा. भिवंडी, मुळ रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश)
याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.