pune city live news खेड सेझमध्ये कामाच्या वादातून तुफान राडा; १५ जणांच्या टोळक्याकडून ठेकेदार व कामगारांना मारहाण, खेड पोलिसांत गुन्हा दाखल
खेड / राजगुरुनगर (विशेष प्रतिनिधी):
निमगाव (ता. खेड, जि. पुणे) येथील खेड सेझ परिसरातील नव्याने सुरू होत असलेल्या ‘जी. एस. स्कान’ कंपनीच्या जागेत डेव्हलपमेंट व खोदकामाच्या वादातून १५ जणांच्या टोळक्याने बेकायदा गर्दी जमवून ठेकेदार, त्यांचे भागीदार व वाहनांच्या चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ऋतिक संभाजी शिंदे (वय २५, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) यांच्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी ऋतिक शिंदे, त्यांचे भागीदार भाऊसाहेब दशरथ राऊत, सुरेश दिलीप शिंदे आणि सागर देवराम कौटकर यांना निमगाव खेड सेझ येथील ‘जी. एस. स्कान’ कंपनीकडून जागेचे डेव्हलपमेंट व मटेरियल सप्लायचे काम मिळाले आहे. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे भागीदार पोकलेन मशीनच्या साहाय्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या (धुमाळ साहेब व गाडे साहेब) उपस्थितीत खोदकामाचे काम सुरू करत होते.
काम सुरू असतानाच निमगाव परिसरातील स्थानिक १५ जण स्विफ्ट कार (क्र. MH 14 EV 9233), इनोव्हा, पिकअप व्हॅन व दुचाकींवरून बेकायदा जमाव जमवून घटनास्थळी आले. "येथे तुम्ही खोदायचे काम करायचे नाही, येथे काम आम्हीच करणार; दुसरा कोण काम करतो ते बघतोच!" अशी अरेरावी करत सनी शिंदे याने फिर्यादी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.
मध्यस्थी करणाऱ्यांनाही धक्काबुक्की व मारहाण
आरोपींनी फिर्यादी ऋतिक शिंदे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली असता, भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेले त्यांचे मित्र भाऊसाहेब राऊत व सुरेश शिंदे यांनाही टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच समाधान कोठावळे यांच्या चालकालाही दमदाटी व मारहाण करून तेथून पळवून लावले.
'डायल ११२' मुळे अनर्थ टळला; जखमींवर चांडोली रुग्णालयात उपचार
घटनास्थळी तणाव वाढल्याचे पाहून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. खेड पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी व त्यांच्या मित्रांना पोलिसांनी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर ऋतिक शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात हजर राहून रीतसर फिर्याद नोंदवली.
या १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल:
खेड पोलिसांनी फिर्यादीनुसार खालील संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
सनी पोपट शिंदे
रोशन छबू काळे
गणेश नामदेव तांबे
कैलास अविनाश तांबे
राजेश बबन शिंदे
अनिल यशवंत शिंदे
गणेश काळूराम सातपुते
विशाल सुनील तांबे
अनिल शांताराम काळे
सतीश मारुती काळे
संजय सुदाम काळे
हर्षवर्धन मोहन शिंदे
संतोष भोंडवे
दत्तात्रय काळूराम सातपुते
संदेश सुरेश शिंदे
(सर्व रा. निमगाव, ता. खेड, जि. पुणे)
या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. औद्योगिक वसाहतीत स्थानिक ठेकेदारीच्या वादातून अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्या गुंड प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.