Bund Garden Police: राजा बहादूर मिल्स येथील कार शोदरम्यान तरुणावर हल्ला; गाडी अडवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी, बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

  




Bund Garden Police पुण्यातील राजा बहादूर मिल्स येथे आयोजित कार शोदरम्यान किरकोळ वादातून एका २० वर्षीय तरुणाला गाडी अडवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे (कात्रज) येथे राहणारा २० वर्षीय विद्यार्थी अली दस्तगीर शेख हा २७ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आपल्या मित्रांसोबत (कार क्र. MH 12 HS 5165) राजा बहादूर मिल्स येथे कार शो पाहण्यासाठी गेला होता.

त्यावेळी कोंढवा येथील रहिवासी अब्दुल जलाल अल्ताफ मेमण याचे तिथे उपस्थित असलेल्या इतर काही व्यक्तींसोबत भांडण सुरू होते. ओळखीचा असल्याने फिर्यादी अली शेख तिथे उपस्थित असताना, अब्दुल याने कोणतीही चूक नसताना अचानक अलीकडे धाव घेत "माझे वडील बिल्डर आहेत, तुला बघून घेतो" अशी धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली.

त्यानंतर अब्दुलने फोन करून आपल्या वडिलांना घटनास्थळी बोलावून घेतले. फिर्यादी व त्याचे मित्र कारमधून घरी निघत असताना, अब्दुलचे वडील अल्ताफ सत्तार मेमण (रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी इतर २ ते ३ साथीदारांसह फिर्यादीची गाडी अडवली. आरोपींनी तरुणांना गाडीतून बाहेर ओढून कॉलर पकडली आणि "माझ्या मुलाला का मारले?" असा जाब विचारत शिवीगाळ केली व थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी अली शेख याच्या फिर्यादीवरून अब्दुल जलाल मेमण आणि त्याचे वडील अल्ताफ सत्तार मेमण यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post