मुंबई:
दिलेला शब्द फिरवायचा नाही, या आपल्या स्टाईलचा प्रत्यय देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चपराक देणारा आणि राज्यातील तरुणाईचा छाती फुगवणारा मोठा निर्णय प्रत्यक्षात आणला आहे! अग्निवीरांच्या भवितव्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांच्या तोंडावर अक्षरशः कुलूप लावत, फडणवीस सरकारने २८२ नौदल अग्निवीरांना थेट महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट करून घेत खाकी वर्दी बहाल केली आहे.
देशासाठी सीमेवर लढणाऱ्या वीरांना सेवेनंतर वाऱ्यावर सोडणार नाही, ही केवळ घोषणा नव्हती तर तो सरकारचा पक्का संकल्प होता, हेच या निर्णयाने सिद्ध झाले आहे. राज्य मंत्रिमंडळात घेतलेल्या आरक्षण धोरणाचा धडाका लावत, नियमांत तातडीने बदल करून या २८२ शूरवीरांच्या नियुक्तीचे आदेश थेट त्यांच्या हातात टेकवण्यात आले आहेत.
नेमकी काय आहे फडणवीसांची ही 'मास्टरस्ट्रोक' खेळी?
केंद्राकडून महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या नौदलातील अग्निवीरांची पहिली यादी राज्य शासनाकडे धडकली होती. वेळ न दवडता प्रशासनाने चक्रे फिरवली आणि या संपूर्ण तुकडीला राज्य पोलीस दलात मानाचे स्थान दिले:
- डेकसाईड खलाशी: १५० जवान आता पोलीस शिपाई म्हणून रस्त्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखणार.
- इंजिनसाईड खलाशी: १३२ तांत्रिक दृष्ट्या सक्षम जवान आता पोलीस खात्याची ताकद वाढवणार.
- एकूण नियुक्ती: तब्बल २८२ अग्निवीरांच्या खांद्यावर थेट 'महाराष्ट्र पोलीस'ची पाटी चढली आहे.
सोशल मीडियावर फडणवीसांचे थेट आव्हान!
या ऐतिहासिक निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर जाहीर पोस्ट करत या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केले.
"आनंदाची बातमी! देशासाठी लढणाऱ्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानुसार नियमात बदल करून २८२ अग्निवीरांना नियुक्ती देण्यात आली आहे. नव्या भूमिकेत या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!"
फडणवीसांच्या या निर्णयामुळे ज्या अग्निवीर योजनेवरून राजकीय धुरळा उडवला जात होता, त्याला महाराष्ट्राने थेट कृतीतून उत्तर दिले आहे. समुद्राच्या लाटांवर देशाचे रक्षण करणारे हे वीर आता महाराष्ट्रातील गल्लीबोळात आणि संवेदनशील भागात गुन्हेगारांचा थरकाप उडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. खाकी वर्दीत दाखल झालेल्या या नव्या दमाच्या 'सुपरकॉप्स'मुळे पोलीस दलाला तर नवी ताकद मिळालीच आहे, शिवाय महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे की, सैनिकांचा सन्मान कसा राखायचा असतो!