पुणे ग्रामीण क्राईम | इंदापूर तालुक्यात डीपी चोरांचा धुमाकूळ! तब्बल दीड लाखांची तांब्याची तार लंपास; भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल 🚨⚡

भिगवण (पुणे): इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची (डीपी) चोरी करणाऱ्या टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मौजे मदनवाडी गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडून त्यातील प्रत्येकी १०० किलो वजनाची तांब्याची तार लंपास केली आहे. या घटनेत महावितरणचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? महावितरणच्या भिगवण शाखेत कार्यरत असलेले वायरमन साजिद तय्यब शेख (वय ३५, रा. यश हाईट्स, भिगवण; मूळ रा. घातोला, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मदनवाडी गावातील शेतीपंपांच्या वीज वितरणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मदनवाडी तलाव परिसरात गेल्या ६ वर्षांपूर्वी १०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले होते. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी पाहणी केली असता सर्व ट्रान्सफॉर्मर सुरळीत जागेवर होते.

दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी स्थानिक शेतकरी संजय कदम यांनी वायरमन शेख यांना फोन करून मदनवाडी तलाव परिसरातील ट्रान्सफॉर्मर खांबावर दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता वायरमन शेख यांनी शेतकरी संजय कदम, शुभम भाऊसाहेब गुरव, गणेश पोपट कदम, शुभम हनुमंत देवकाते, नंदकुमार रंगनाथ देवकाते, मारुती ज्ञानदेव बंडगर आणि प्रकाश नंदकुमार चिकुर्डे यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

खांबावरून खाली पाडून ऑईल सांडले, तांब्याची तार गायब पाहणीदरम्यान खालील तीन ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडून फोडल्याचे निष्पन्न झाले:

  • मदनवाडी तलाव डीपी (१०० केव्ही, डीटीसी कोड: ४७२३५९२)

  • वाळवे डीपी (१०० केव्ही, डीटीसी कोड: ४७२३५७६)

  • महेश डीपी (१०० केव्ही, डीटीसी कोड: ७२३३५०१)

अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तिन्ही ट्रान्सफॉर्मर जमिनीवर पाडले. त्यातील ट्रान्सफॉर्मर ऑईल खाली सांडून नुकसान केले आणि प्रत्येकी १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा (प्रति किलो ५०० रुपये दराने) असा एकूण ३०० किलो तांब्याचा माल (किंमत अंदाजे १,५०,००० रुपये) चोरून नेला.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पोलिसांकडून तपास सुरू या घटनेची माहिती वायरमन शेख यांनी महावितरणचे भिगवण शाखा साहाय्यक अभियंता वैभव प्रकाश भुजबळ यांना दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार साजिद शेख यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात अधिकृत फिर्याद नोंदवली.

शेतीचा हंगाम सुरू असतानाच ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भिगवण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील संशयितांची चौकशी सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post