कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी अमोल लिंब सरबत विकून कष्टमय जीवन जगत आहे, वाचा सम्पूर्ण स्टोरी

 अवघडलेल्या वाटेवर तो उभा आहे. वादळाशी झुंज देत..!

हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेले सुंदर असे खिरेश्वर गाव आहे. गावात बहुतांशी लोक आदिवासी समाजाचे आहेत. आदिवासी समाज म्हंटला की प्रेम , जिव्हाळा , साधेपणा आणि माणुसकी या गोष्टीचे दर्शन घडणारच  ! याच गावातील अमोल चिमाजी मुठे अवघा ९ वर्षाचा चिमुकला या VIP ला भेटण्यासाठी खास शुक्रवारी दि.४ मार्च २०२२ रोजी खिरेश्वर येथे जाण्याचा योग आला. जिल्हा परिषद शाळेत चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत असणारा अमोल वयाने जरी लहान असला तरी देखील मनाने आणि कर्तृत्वाने मात्र महान आहे. घरात आई वडील , एक मोठी बहीण , लहान भाऊ असा त्याचा परिवार आहे. ज्यावयात मुलांनी खेळावं बागडाव त्या वयात हा चिमुकला हरिश्चंद्रगडावर सुट्टीच्या मोकळ्या दिवशी लिंबूसरबत विकण्याचा व्यवसाय करत आहे. अमोल ची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मात्र या गरिबीचे दुःख उराशी न बाळगता अमोल त्यावर मात करत आहे. 

मागील तीन वर्षांपासून  गडाच्या अर्ध्या अंतरावर अर्धा ते पाऊण तासाची पायपीट करून अमोल सकाळीच हरिश्चंद्रगडावर जातो. गड चढून येणारा थकलेला पर्यटक अमोलच्या लिंबूसरबतचा आस्वाद घेतो. त्याबदल्यात अमोलला एका ग्लासामागे वीस रुपये भेटतात. अतिशय हुशार आणि चुणचुणीत अमोल पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. अनेक पर्यटक त्याच्या बोलण्याने प्रभावित होतात.परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. इतक्या लहान वयात एखाद्या अनुभवी व्यावसायिकाला लाजवेल अश्या प्रकारे लिंबूसरबत विकण्यासाठी नम्रपणे व बिनधास्त अमोल बोलत असतो. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी अमोल लिंब सरबत विकून कष्टमय जीवन जगत आहे. ९ वर्षाच्या या व्यावसायिकाने पर्यटनाचे महत्व जाणले आहे. आदिवासी भागातील अनेक तरुणांसाठी चिमुकला अमोल एक आदर्श आहे असे मला वाटत आहे. आमच्या आदिवासी भागातील अनेक उच्च शिक्षित तरुण अश्याप्रकारे उद्योग व्यवसायात न उतरता  क्रिकेटच्या नादिलागून स्वतःचे आयुष्य बरबाद करत आहेत.आदिवासींचा खरा गुरू निसर्ग आहे आणि याच निसर्गातून अमोल खूप काही शिकला आहे. आदिवासी भागातील तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. पर्यटनातून व्यवसाय आणि व्यवसायातून स्वतः चा विकास साधला पाहिजे. शुक्रवारी अमोल ला भेटून त्याच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम डावखर साहेब यांनी अमोल ला कोकम सरबत बनविण्याचे साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य भेट दिले. घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील आम्ही निरोप घेत असतानाच अमोल व त्याच्या आईने घरात असलेले थोडेसे तांदूळ घेऊन जाण्याचा आग्रह केला. घरी आलेल्या पाहुण्याला रिकाम्या हाताने लावू नये. हीच आदिवासी परंपरा आहे. म्हणूनच आदिवासी संस्कृती जगात महान आहे. त्यांचा आग्रह जरी होता तरी आम्ही काही घेणार नाही असे सांगितले मात्र अमोल चा एक वेगळा आदर्श नक्कीच आम्ही व समाजाने घेतला पाहिजे असे सांगत अवघडलेल्या पावलांनी निरोप घेतला. खरंतर सर्व समाज बांधवांनी अमोलच्या लिंबूसरबत स्टॉलला एका अवश्य भेट द्यावी. तो करत असलेल्या कामाचं व व्यवसायाचे कौतुक करावे हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि अमोल भावी आयुष्यात मोठा उद्योजक व्होवो ही सदिच्छा बाळगतो.

किरण दिलीपकुमार म्हसकर 

मो.नं – 9011110569

Leave A Reply

Your email address will not be published.