विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार
समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची गंभीर नोंद समाज कल्याण विभागाने घेतली असून आयुक्त, समाज कल्याण यांनी जी महाविद्यालये शासनाच्या आदेशांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर तत्काळ योग्य ती कारवाई करावी अशा सूचना राज्यातील विद्यापीठांना केल्या आहेत, असे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी पत्रकाव्दारे प्रसिद्धीस दिले आहे.