अहिल्यानगर हादरलं! विहिरीतील पाणी उपसलं अन् बाहेर आले प्रेमी युगुलाचे मृतदेह; खुरंगेवाडीत नेमकं काय घडलं ?
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुका सध्या एका भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेने सुन्न झाला आहे. खुरंगेवाडी परिसरात एकाच विहिरीमध्ये तरुण आणि तरुणीचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सकाळी तरुणीचा मृतदेह, तर रात्री प्रियकराचा...
खुरंगेवाडीतील शिंगाडे यांच्या विहिरीत बुधवारी सकाळी १८ वर्षीय वैष्णवी जगधने हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर गावात एकच गोंधळ उडाला. त्यातच २१ वर्षीय वैभव शिंगाडे हा तरुणही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली.
पाणी उपसून शोधलं रहस्य!
विहीर खोल असल्याने नेमकं काय दडलंय हे समजत नव्हतं. अखेर मोठ्या पंपांच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू झाले. दिवसभराच्या थरारानंतर रात्रीच्या अंधारात विहिरीतून वैभव शिंगाडे याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला.
आत्महत्या की आणखी काही?
वैष्णवी आणि वैभव यांच्यात प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे, मात्र दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? की यामागे काही वेगळाच घातपात आहे? हे कोडं अजूनही उलगडलेलं नाही. मिरजगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
पुणे, अहिल्यानगर आणि राज्यातील अशाच ताज्या घडामोडींच्या सविस्तर वृत्तासाठी punecityline.in ला नक्की भेट द्या.