डोक्यावर अक्षता पडण्याआधीच काळाचा क्रूर घाला! साखरपुडा झालेल्या ३२ वर्षीय ओंकारचा दुर्दैवी अंत; साताऱ्यातील खटाववर शोककळा | Satara news

 संसाराची गोड स्वप्नं डोळ्यांत तरंगत होती... घरामध्ये लग्नाची धामधूम सुरू होणार होती, नातेवाईकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण, नियतीच्या मनात काहीतरी भलतंच सुरू होतं. डोक्यावर बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याआधीच काळाने असा काही क्रूर घाला घातला की एका क्षणात हसत्या-खेळत्या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. सातारा जिल्ह्यातील खटाव येथील अवघ्या ३२ वर्षांच्या ओंकार ज्ञानेश्वर फडतरे या होतकरू तरुणाचा भीषण दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरावर प्रचंड शोककळा पसरली आहे.

मंगळवारची ती रात्र ठरली काळरात्र!

नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ओंकार आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यात अचानक घात झाला. अपघात इतका भीषण होता की ओंकार गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेत त्याला वाचवण्यासाठी दवाखान्याकडे धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मेहनती, कष्टाळू आणि गावातला लाडका तरुण...

ओंकार हा केवळ कुटुंबाचा आधार नव्हता, तर पंचक्रोशीतील एक अत्यंत मेहनती आणि जिद्दी तरुण म्हणून त्याची ओळख होती. स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय सांभाळत तो प्रसिद्ध जरंडेश्वर साखर कारखान्यातही प्रामाणिकपणे काम पाहत होता. आपल्या कष्टाच्या जोरावर तो पायावर उभा राहिला होता आणि म्हणूनच घरच्यांनी मोठ्या उत्साहाने त्याचे लग्न जमवले होते.

आनंदाच्या घरात पसरली स्मशानशांतता

लग्न ठरल्यामुळे फडतरे कुटुंबात प्रचंड आनंदाचे वातावरण होते. खरेदीच्या चर्चा, लग्नाचे बेत आखले जात होते. मात्र, एका बेभान क्षणाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत आहे.

ओंकारच्या पश्चात त्याचे वृद्ध आई-वडील, भाऊ, विवाहित बहीण आणि चुलते असा परिवार आहे. घराचा मुख्य आधारवड अचानक निघून गेल्याने फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खटाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post