Dada Patil College: मध्ययुगीन कालखंडापासून संत ज्ञानेश्वर , नामदेव यांनी ते परदेशात स्थायिक झालेल्या अर्वाचीन कालखंडातील महाराष्ट्रीय लोकांपर्यंत सर्वांनीच मराठी भाषा संवर्धनाचे कार्य केलेले आहे.आजच्या लेखक, संशोधक व प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी भाषेच्या बाबतीत जागतिक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत याचा अभ्यास व संशोधन करावे ,असे आवाहन हॉलंड येथील जागतिक कीर्तीचे शिल्पकार, चित्रकार, संशोधक व लेखक श्री. भास्कर हांडे यांनी केले.
येथील दादा पाटील महाविद्यालय (Dada Patil College) व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात ‘ मराठी भाषेचा जागतिक आविष्कार ‘ या विषयावर श्री. हांडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे होते.
संत ज्ञानेश्वर, तुकारामांचे साहित्य आज जागतिक पातळीवर विविध भाषांतून भाषांतरित झालेले आहे. संत नामदेवांनी मराठी भाषेचा झेंडा आपल्या अभंगांच्याद्वारे पंजाबपर्यंत नेऊन पोचवला. या सर्व संतांनी समकालीन वास्तव आपल्या आध्यात्मिक साहित्यातून मांडले त्यामुळे या साहित्याचे महत्त्व व लोकप्रियता समाजात कायम टिकून आहे .ब्रिटिश लायब्ररीत मराठी भाषेचे अनेक पुरावे सापडतात .मॉरिशसमध्ये मराठी साहित्य व संस्कृती टिकविण्याचा तेथील मराठी भाषक आवडीने व अभिमानाने प्रयत्न करत असल्याचे कितीतरी पुरावे आहेत.तर युरोपियन देशात मराठी संमेलने होतात .असे जागतिक पातळीवरील मराठी भाषेच्या अविष्काराचे अनेक पुरावे श्री. हांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सांगून त्यावर अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.नगरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मातृभाषा हे प्रत्येकाच्या शिकवणुकीचे मूळ असते. महाराष्ट्रातील मराठी भाषक समाज आपली संस्कृती, आपली भाषा साहित्याद्वारे जतन करत आहे; एवढेच नाही तर कर्जतसारख्या ग्रामीण भागातील लोकसुद्धा आपल्या बोलीभाषेच्या वापरातून मराठी भाषेचे सामर्थ्य वाढविण्यास हातभार लावत असून, भाषा संवर्धित करण्याचे काम करत आहेत.
या ऑनलाईन कार्यक्रमाचे ( online event)प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.भास्कर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले ,तर आभार डॉ.भारती काळे यांनी मानले. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य प्रा. सुरेश साळुंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी उपप्राचार्य डॉ.महेंद्र पाटील आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. संदीप पै, डॉ. संतोष लगड ,प्रा. भागवत यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, मराठी भाषेचे अभ्यासक , संशोधक आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने सहभागी झाले.