कर्जत
नगरपंचायत
निवडणुकीसाठी भलेही मोठ्या
प्रमाणावर उमेदवारी अर्ज होत असले
तरी इच्छुकांना आधी स्थानिक
समिती, मान्यवर नेते, पदाधिकारी
व कार्यकर्त्यांसमोर अग्निपरीक्षा
द्यावी लागणार आहे. यातूनच कर्जत न.पं. निवडणूक
उमेदवार म्हणून सिलेक्शन झाले
तरीही मतदार राजाच्या इलेक्शन
मध्येही आपला टिकाव लागणार का
याचेही अग्निदिव्य अनेकांना पार करावे
लागणार आहे.
कर्जत नगरपंचायतीत सत्ताधारी व
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार
असो किंवा माजी मंत्री राम शिंदे
शिवसेनेचा गट किंवा काँग्रेस चा गट
यासह काही अन्य
पक्ष संघटना या अर्ज दाखल होत
आहेत. अर्ज दाखल उमेदवारांमधून
आता संबंधित गटांची पॅनल अथवा
मैत्रीपूर्ण, अपक्ष, बंडखोर आदींचे
सिलेक्शन तथा निवडी होतील.
तेरा डिसेंबर रोजी अर्ज माघारीनंतर
ही निवडणूक दुरंगी, तिरंगी, चौरंगी
की बहुरंगी होणार हेदेखील स्पष्ट
होणार आहे. उमेदवार निवडीत प्रमुख
सत्ताधारी गटाच्या नेते, पदाधिकारी,
कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.
त्याचवेळी सत्ताधारी गटाकडून
इच्छुकांच्या भाऊ गर्दीचा व नाराजीचा
फायदा उठवताना विरोधक मंडळीही
या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष नव्हे डोळा
ठेवून आहे. त्यामुळे या उमेदवार
निवडीवरच सत्ताधारी व विरोधकांच्या
विजयाची गणिते अवलंबून
आहेत.
ते कसे काय प्रभागाला कसे पाणी पाजणार ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात प्रामुख्याने सामाजिक कार्य करणाऱ्या
कार्यकर्त्याला संधी मिळते. कर्जत नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
केलेल्यांमध्ये काही असे इच्छुक आहेत की ज्यांनी कधी शेजारच्याला साधे
पाणीही विचारले नाही अथवा कोणाच्याही सुख-दुःखात ते सहभागीही
नसतात. मात्र तरीही त्यांची उमेदवारीसाठी धडपड सुरू असल्याने प्रामाणिक
कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. ज्यांनी शेजाऱ्याला कधी ग्लासभर पाणी
विचारले नाही किंवा स्थानिकांची साधी ख्यालीखुशालीही विचारली नाही
ते आता प्रभाग व शहराला कसे पाणी पाजणार? अशाही चर्चा असून मतदार
याचा निश्चितच विचार करतील यात शंकाच नाही.
तेरा डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. डिसेंबरला दुपारनंतर येथे काही
प्रभागात बिनविरोध की सर्वच प्रभागात निवडणूक होणार याचे चित्र स्पष्ट
होईल.