मतदारांत चर्चा : कोण होणार बाजीगर, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचीही प्रतिष्ठा पणाला
कर्जत : कर्जत शहरातील होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आजी व माजी आमदारांची परीक्षा व सामर्थ्य बघणाऱ्या ठरणार आहेत. या निवडणुकीत आजी की माजी कोण • बाजी मारतो ते दिसणार आहे.
कर्जत तालुक्यातील राजकीय रागरंग दोन वर्षांत बदलून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत भाजपला पाणी पाजले. आपल्याकडे विजयश्री खेचून आणली. साहजिकच सत्ता पक्षाकडे कार्यकर्ते ओढले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत काँग्रेस पक्ष होता. एकीच्या बळाने राष्ट्रवादी पक्षाला कर्जत जामखेड विधानसभा जिंकता आली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी आहे. मात्र, आता नगरपंचायत निवडणूक कोणाच्या पारड्यात..?
कर्जत नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप पक्षाने एकहाती सत्ता मिळविली होती. तब्बल १७ पैकी १२ सदस्य निवडून आले होते. तर एका अपक्ष महिला सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. तो पराभव राष्ट्रवादी च्या जिव्हारी लागला होता, काँग्रेस ला ४ व राष्ट्रवादी पक्षाला एकही जागा कर्जत नगरपंचायतीमध्ये मिळविता आली नव्हती. त्यावेळी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी पक्ष वेगळे लढले होते. तरीही काँग्रेसने बरा-यापैकी यश मिळवले होते. आता ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिष्ठेची राहिली आहे. राष्ट्रवादी पक्षाला आपली अस्मिता दाखवून देण्याची वेळ आहे. तसेच काँग्रेस मागील ताकदीने
लढली त्यापेक्षा जास्त ताकदीने निवडणूक लढते का हे पाहाणे महत्त्वाचे आहे. आपली ताकद
लक्षात घेऊन आपली मजल कुठपर्यंत मारते हे दिसणार आहे. एवढे मात्र खरे ही आजी माजी आमदारांच्या परीक्षेची घडी आली आहे.
भाजपने नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाला एक उमेदवार निवडून आणता आले नाही हे जरी खरे असले तरी
आता मात्र परिस्थिती मोठा फरक पडलेला आहे.
कर्जत चे आमदार रोहित दादा पवार आता स्वतः च्या हिंमतीने नगरपंचायत पंचायत ताब्यात घेवू शकतात. त्या पध्दतीने त्यांनी वाटचाल केली आहे.
रोहित दादा पवार यांच्या मुळे राष्ट्रवादीत चैतन्य
कर्जत तालुक्यात व शहरात रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मार्गक्रमण करीत असून त्यांनी आपल्या विकास कामाने अनेकांना प्रभावित केले आहेच याशिवाय भाजप व काँग्रेस पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणूक मात्र रंगतदर
होणार आहे.
राष्ट्रवादी आपल्या बळावर निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी चे आमदार रोहित दादा पवार यांचे सामर्थ्य बघणारी ही निवडणूक ठरणार आहे. तसेच दोन वर्षांत राजकीय वातावरण पालटले असल्याने माजी आमदार व मंंत्री राम शिंदे
यांचा ही निवडणूक कस पाहणार आहे. ही निवडणूक हा कस नुसता नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचासुद्धा बघणार आहे..
तथापि, आघाडीच्या पक्षातील सर्वांनी एक होऊन लढावे, अशी सामान्य कार्यकर्त्यांची आजही भावना आहे. पण सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेची रूट लेव्हलवर कदर केली जात नाही, असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
कर्जत मध्ये राजकीय मोर्चेबांधणी
नगरपंचायतीच्या निवडणुकीत जोरदार संघर्ष होण्याचे संकेत दिसत आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची यादी आहे. निवडणुकीत जुन्या नव्या समीकरणांचे प्रयोग सुरू असून आघाडी की स्वबळ लढायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.
शहराचे सत्ताकेंद्र असलेल्या नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे गत चार-पाच वर्षांतील राजकीय
नगरपंचायत निवडणूक वार्तापत्र
प्रयोग तर दुसरीकडे होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जुन्या नव्याचे प्रयोग यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळणार का आणि कधी, असा प्रश्न केला जात आहे.
सध्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातून एकास एक पूरक उमेदवार तयार केले जात असून निवडणुकीत जोरदार रंगत येण्याचे चित्र आहे. निवडणुकीसाठी जुन्या चेहऱ्यांनी नेत्यांच्या जवळ फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नवे चेहरे अद्याप प्रतीक्षेतच आहेत.
शहरात अंतर्गत राजकीय खलबते सुरू असून आघाडी की स्वबळ लढायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे; परंतु सर्वच प्रभागांत इच्छुकांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने आघाडीचा प्रयोग झाल्यास जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. जागा वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार का हेही पाहणे गरजेचे ठरणार आहे.
शहराच्या राजकारणात नेहमीच वेगळे राजकीय प्रयोग झाले आहेत.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची यादी असल्याने कोणाला संधी द्यायची व कोणाला थांबवायचे हा प्रश्नही नेत्यांसमोर निर्माण होणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सतरा प्रभाग आहेत. सर्वच प्रभागांत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची यादी आहे. जुन्या नव्या चेहऱ्यानी कागदपत्रे जुळवाजुळव सुरू केली आहे. जुन्या की नव्यांना संधी मिळणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.