पुणे: 'ब्रेक का मारला?' म्हणत डिलिव्हरी बॉयला लुटले; दोन तरुणांकडून मोबाईल हिसकावून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन Delivery boy robbed
पिंपरी-चिंचवड: शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरीमध्ये डिलिव्हरी बॉयला लुटल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर अचानक गाडी थांबवल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद घालून, दोन तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयला धमकावले आणि त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी फोनमधील ऑनलाइन पेमेंट ॲपमधून पैसेही जबरदस्तीने काढून घेतले.Delivery boy robbed
ही घटना दि. २०/०८/२०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पिंपरी पुलाजवळील गोकुळ हॉटेल समोरील रोडवर घडली. फिर्यादी प्रणय कुमार स्वाईन (वय ३८) हे डिलिव्हरीचे काम संपवून जात असताना, अचानक एक कुत्रा समोर आल्याने त्यांनी बाईक थांबवली. त्याचवेळी, त्यांच्या पाठीमागून आलेल्या रिक्षातील आरोपींनी, 'गाडीला ब्रेक का मारला? त्यामुळे आम्ही पडलो असतो, आमची भरपाई द्या' असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादाचे रूपांतर जबरदस्तीत झाले. आरोपींनी प्रणय कुमार यांच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर, त्यांनी प्रणय कुमार यांना धमकावून त्यांचा फोनपे युपीआय नंबर घेतला आणि त्यांच्या खात्यातून तीन वेळा ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करत एकूण ६५०० रुपये काढून घेतले.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना, सुदर्शन थोरात आणि यश कांबळे यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. अशा घटना लक्षात घेता, रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोबाईल वापरताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.