पुण्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाने कोट्यवधींचा गंडा! बनावट 'IIFL Capital' प्लॅटफॉर्मवर ६३ लाखांची फसवणूक
पुणे: पुणे शहर सध्या सायबर गुन्हेगारांचे सर्वात मोठे लक्ष्य बनले आहे. ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून एका व्यक्तीने तब्बल ६३ लाख ९३ हजार रुपयांची मोठी रक्कम गमावली आहे. बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही सायबर फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना दि. १०/०७/२०२५ ते दि. ०५/०८/२०२५ या कालावधीत घडली. फिर्यादी अभिषेक अशोक कुमार सिंग (वय ४०) यांना आरोपींनी 'IIFL Capital' नावाच्या एका बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. आरोपींच्या जाळ्यात अडकून त्यांनी या प्लॅटफॉर्मवर टप्प्याटप्प्याने एकूण ६३,९३,५००/- रुपये गुंतवले.
गुंतवणूक केल्यानंतर, आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या खात्यावर तब्बल ७,५६,९१,४६०/- रुपये नफा झाल्याचे खोटे आकडे दाखवले. जेव्हा फिर्यादीने ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी नफा काढण्यासाठी २० टक्के कमिशनची मागणी केली. कमिशन दिल्यानंतरही आरोपींनी गुंतवलेली मूळ रक्कम किंवा नफा परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. ऑनलाइन फसवणुकीचे असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. गुंतवणूक करताना अधिकृत कंपन्या आणि प्लॅटफॉर्मचा वापर करावा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच जास्त नफ्याचे आश्वासन देणाऱ्या बनावट योजनांपासून सावध रहावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.