आळंदी: शहराला लागून असलेल्या आळंदी-मरकळ रस्त्यावर 'आम्ही पिंपरी-चिंचवडचे डॉन आहोत,' असे ओरडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३ आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
काय घडलं?
ही घटना ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास आळंदी-मरकळ रस्त्यावरील आराध्या हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी धिरज ज्ञानेश्वर कोलते (वय ३२, रा. मोशी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, धिरज कोलते हे दुचाकीवरून जात असताना, आरोपींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर, आरोपींनी अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी क्रमांक २ याने धिरज यांच्या छातीवर आणि पोटात बुक्क्या मारल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्याचवेळी इतर आरोपींनी पट्ट्याने आणि लाथा-बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली.
‘आम्ही आताच ३०२ मधून बाहेर आलोय’
आरोपींनी मारहाण करत असताना रस्त्याने जाणाऱ्या लोकांना धमकावले. 'येथे कोणीही थांबणार नाही, जर कोणी याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर एक-एकाला संपवून टाकणार,' अशी धमकी देत आरोपींनी 'आम्ही आताच ३०२ मधून बाहेर आलोय, आम्ही पिंपरी-चिंचवडचे डॉन आहोत, आमची हिस्ट्री तपासा,' असे ओरडून दहशत निर्माण केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
किरकोळ वादातून हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ किशन वरताळे याच्यासोबत फिर्यादीचा कंपनीत किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून सूड घेण्यासाठी किशनने इतर साथीदारांना सोबत घेऊन हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत किशन परसराम वरताळे (वय २८), साईनाथ किशन वरताळे (वय २४) आणि समीर यादव गजभारे (वय २०) या तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भररस्त्यात अशा प्रकारे मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.