पुणे, ०२ ऑगस्ट २०२५: पुणे-मुंढवा रोडवर शुक्रवारी (दि. ०१ ऑगस्ट २०२५) पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडवून कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे १:०० ते १:३० वाजण्याच्या दरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली. मुंढवा रोडवरील धनगरवाडा (hotel dhangarwada )हॉटेलसमोरील रस्त्यावर, मांजरी, पुणे येथे हा अपघात झाला.
फिर्यादी (वय १८, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा भाऊ कुणाल संतोष घाडगे (वय २१, रा. दीपक नगर, घाडगे वस्ती, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे) आणि चुलत भाऊ महेश बबन घाडगे हे रस्त्यावरून जात असताना, एका अज्ञात कारचालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगात आपली कार चालवली.
या भरधाव कारने कुणाल आणि महेश यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कुणाल संतोष घाडगे यांचा जागीच मृत्यू झाला. महेश घाडगे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात घडवल्यानंतर, त्या कारवरील चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता, पोलिसांना माहिती न देता थेट घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब), ११९/१७७, १८४ नुसार अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून अज्ञात कारचालकाचा कसून शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भरधाव आणि बेदरकार वाहन चालवून निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.