Aalandi News आळंदी, २९ जुलै २०२५: मरकळ ते आळंदी रस्त्यावर सोमेश्वर मिसळ हॉटेलसमोर रविवारी (दि. २७ जुलै २०२५) दुपारी एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, १२ वर्षांचा एक मुलगा जखमी झाला आहे. अपघात घडवून ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम निलेश काबरा (वय १७ वर्षे) याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर आराध्य निलेश काबरा (वय १२ वर्षे) हा जखमी झाला आहे. ही घटना २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मौजे मरकळ गावाच्या हद्दीत, मरकळ ते आळंदी जाणाऱ्या रोडवर सोमेश्वर मिसळ नावाचे हॉटेलसमोर घडली.
याबाबत फिर्यादी महेश जयनारायण काबरा (वय ५१, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, टाटा ट्रेलर क्रमांक एमएच १४ एलबी ७६७७ वरील चालक युवराज बाबासाहेब नाकाडे (वय २५, रा. गहिनीनाथ नगर, पो. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना) याने त्याचे ताब्यातील ट्रेलर मरकळ ते आळंदी रोडवर भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि वाहतुकीचे नियम मोडून, त्याने तुळापूर बाजूकडून येणाऱ्या फिर्यादीच्या चुलत पुतण्या शिवम निलेश काबरा याच्या होंडा अॅक्टिव्हा (एमएच १२ क्युयु ५५०६) दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात शिवम काबरा याचा जागीच मृत्यू झाला, तर आराध्य निलेश काबरा जखमी झाला. अपघात घडवल्यानंतर ट्रेलर चालक युवराज नाकाडे हा घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (A), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रेलर चालक युवराज नाकाडे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बेदरकार वाहन चालवल्यामुळे होणारे गंभीर परिणाम या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि सुरक्षितपणे वाहन चालवावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.