तळेगाव दाभाडे, ३० जुलै २०२५: विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी, आजही समाजात अंधश्रद्धा आणि जादूटोणा नावाचा अंधकार किती खोलवर रुजलेला आहे, याचा धक्कादायक प्रत्यय तळेगाव दाभाडे येथे आला आहे. एका महिलेने दुसऱ्याच्या गाडीवर लिंबू, हळदी आणि कुंकू टाकून अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मंगळवारी (दि. २९ जुलै २०२५) रात्री १०:०० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास, तळेगाव दाभाडे येथील २७८ शनिवार पेठेत ही विचित्र घटना घडली. सहास बळीराम गरुड (वय ४९) या समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर असलेल्या गाडी पार्किंगच्या जागेवर हा प्रकार घडला.
फिर्यादी सहास गरुड यांच्या तक्रारीनुसार, कमल पांडुरंग भेगडे नावाच्या महिलेने त्यांच्या मालकीची मारुती एस-क्रॉस गाडी (एमएच १४ जी वाय ३६२३) जिथे पार्क केली होती, तिथेच येऊन एक कागद ठेवला. त्या कागदात लिंबू होते आणि त्यावर हळदी-कुंकू टाकले होते. हा शुद्ध जादूटोण्याचा प्रकार होता, असे फिर्यादीचे म्हणणे आहे.
एखाद्याच्या गाडीवर किंवा मालमत्तेवर अशा प्रकारे जादूटोणा करणे, त्यामागे दुष्ट हेतू असणे, हे केवळ अंधश्रद्धाच नाही, तर कायद्याने गुन्हा आहे. समाजाला विज्ञानाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना असे प्रकार घडणे गंभीर आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अन्वये कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेला अद्याप अटक झालेली नसून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.