PCMC : रावेतमध्ये 'आक्याभाई'चा हैदोस! 'मुझे पहचाना नही क्या' म्हणत सिक्युरिटी गार्डला मारहाण, ४,३७० रुपये लुटले

PCMC : रावेतमध्ये 'आक्याभाई'चा हैदोस! 'मुझे पहचाना नही क्या' म्हणत सिक्युरिटी गार्डला मारहाण, ४,३७० रुपये लुटले



पुणे: रावेत परिसरात (Ravet area) एका सिक्युरिटी गार्डला (security guard) लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने "मुझे पहचाना नही क्या, मै आक्याभाई हूँ," असे म्हणत धमकावले. प्रतिकार करताच त्याला जबर मारहाण करून खिशातील पैसे आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मदत करणाऱ्या दोघांनाही कोयता दाखवून पळवून लावण्यात आले.


नेमकी काय घडली घटना?

रविवार (दि. ०३ ऑगस्ट २०२५) रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रावेतमधील बालाजी ट्रेडर्सजवळून शिंदेवस्तीकडे जाणाऱ्या एका कच्च्या, अंधाऱ्या रस्त्यावर फिर्यादी नियाज मोहम्मद अन्सारी (वय ३०, धंदा-सिक्युरिटी गार्ड) हे त्यांच्या दुचाकीवरून मित्राचा जेवणाचा डबा घेऊन जात होते.

त्यावेळी, समोरून आलेल्या एका काळ्या रंगाच्या स्कुटीवरील इसमाने नियाज यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावली आणि त्यांना खाली उतरण्यास सांगितले. नियाज यांनी कारण विचारून नकार दिल्यावर, त्याला राग आला. "मुझे पहचाना नहीं क्या? मैं आक्याभाई हूँ, इस एरया में किसी को पुछ, आकाश आल्हाट क्या चीज है," असे म्हणत त्याने दहशत निर्माण केली.

"चल जेब में कितना पैसा है वो निकाल," असे म्हणत आक्याभाईने नियाज यांचा मोबाईल आणि हातातील चांदीचे बॅस्लेट काढण्याचा प्रयत्न केला. नियाज यांनी विरोध करताच, आक्याभाईने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. यातील एकाने फोल्डिंग छत्रीच्या दांड्याने नियाज यांना मारण्यास सुरुवात केली, तर आक्याभाईनेही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

मारहाण करून त्यांनी नियाज यांच्या शर्टच्या खिशातून ४,३७० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.


मदत करणाऱ्यांनाही कोयत्याची धमकी

नियाज यांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जात असलेल्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांना मदत करण्यासाठी आपली गाडी थांबवली. हे पाहून आक्याभाईने आपल्या स्कुटीमधून कोयता बाहेर काढला आणि त्या दोघांच्या दिशेने जाऊन "चलो भागो यहां से, नहीं तो आपका हाल भी इसके जैसा करूंगा," अशी धमकी दिली. यामुळे घाबरून ते दोघे तिथून निघून गेले. त्यानंतर सर्व आरोपी त्यांच्या गाड्या घेऊन पळून गेले.


पोलिसांची कारवाई

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), १२६ (२), ३ (५) सह आर्म्स ॲक्ट कलम ४ (२५), फौजदारी कायदा (सुधारणा) कलम ७, ३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आक्याभाई उर्फ आकाश सुभाष आल्हाट (वय २९) याला अटक केली आहे. इतर तीन अनोळखी मुलांचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post