किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली मारली; आयटी इंजिनिअर गंभीर जखमी
हिंजवडी: हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात एका मित्राने किरकोळ वादातून दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक २७ वर्षीय आयटी इंजिनिअर गंभीर जखमी झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास होम स्टे हॉस्पिटॅलिटी पी.जी. मध्ये घडली. याप्रकरणी अभिनव मनोजकुमार पाठक (वय २७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी अभिनव पाठक आणि आरोपी मिलन साहू (वय अंदाजे ३०, रा. नेपाळ) यांच्यात किरकोळ वाद झाला होता. रात्री अभिनव पाठक टेरेसवर गेले असता, तिथे त्यांचा मित्र लक्ष्मण साहू आणि इतर मित्र बिअर पीत बसले होते. दुपारच्या वादामुळे अभिनव हे त्यांच्यासोबत बोलत नव्हते. त्यावेळी लक्ष्मण साहू मध्यस्थी करत अभिनव यांना समजावत होते.
डोक्यात बिअरची बाटली फोडली
हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आरोपी मिलन साहूने बिअरची रिकामी बाटली उचलून अभिनव पाठक यांच्या डोक्यात जोरदार मारली. या हल्ल्यात अभिनव गंभीर जखमी झाले.
गुन्हा दाखल, आरोपी अटक
या घटनेनंतर अभिनव पाठक यांनी पोलिसांत धाव घेतली. हिंजवडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मिलन साहू याला अटक केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५४८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.