तळेगाव दाभाडे, ३० जुलै २०२५: एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला 'काय बघतोस' या क्षुल्लक कारणावरून जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे फाट्याजवळ घडली आहे. बॅडमिंटन क्लासवरून घरी जाणाऱ्या या मुलाला हेल्मेटने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.(Pune News )
मंगळवारी (दि. २९ जुलै २०२५) सायंकाळी ७:३० वाजताचा थरार... पृथ्वी नागेंद्र सिंग (वय १६) हा बॅडमिंटन क्लास संपवून सोमाटणे फाट्यावरील कुणाल वाईन्ससमोरून आपल्या घरी जात होता. अचानक, काही जणांनी त्याला अडवले. त्यांच्यापैकी 'चिक्या' नावाच्या एकाने पृथ्वीची बॅग ओढली आणि "आमच्याकडे काय बघतोस" असे म्हणत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
पृथ्वी त्यांना "मला मारू नका, मला सोडा" अशी विनवणी करत होता, पण आरोपींनी त्याचे ऐकले नाही. त्यांच्यासोबत असलेला 'राहुल' (राहुल मिलिंद सूर्यवंशी) याने पृथ्वीच्या डोक्यातील हेल्मेटच काढले आणि त्याच हेल्मेटने त्याच्या डोक्यात, छातीत, नाकावर आणि तोंडावर वार केले. या हल्ल्यात पृथ्वी गंभीर जखमी झाला. दरम्यान, आशिष अभिमान सुरवसे यानेही पृथ्वीला लाथा-बुक्क्यांनी छातीत आणि पोटात मारहाण केली.
या भ्याड हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ चे कलम ११८ (२), ११५ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आशिष अभिमान सुरवसे आणि राहुल मिलिंद सूर्यवंशी यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांवर होणारे असे हल्ले चिंताजनक असून, पोलिसांनी यावर कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.